नगर – सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, विनामास्क फिरणे नागरिकांना महागात पडणार आहे. महापालिकेने पाचशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी आदेश काढून दोन दिवस झाले, तरी अद्यापही विनामास्क व थुंकणारे महापालिकेच्या पथकाला सापडले नाहीत. हे शोधण्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आले आहेत. मात्र, अन्य कामांमुळे पथकाला सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे अन् विनामास्क फिरणारे मात्र मिळाले नाहीत.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नुकताच आदेश काढला असून, विनामास्क व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही दंडाची रक्कम प्रत्येकी वेळी वाढत जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना विक्रेता व ग्राहकांमध्ये किमान पाच फूट अंतर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून नगरच्या महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती, सरकारच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स ज्या व्यक्ती पाळणार नाहीत, अशा सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. विनामास्क व थुंकणाऱ्यांना पहिल्यांदा 500, दुसऱ्यावेळेस 1 हजार व तिसऱ्यावेळेस सापडल्यानंतर 2 हजार दंड करण्यात येणार आहे.
किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला व फळे विक्रेते, इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, येथे विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये सोशल डिस्टन्स राहावा, यासाठी दुकानाच्या बाहेर मार्किंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या दुकानांच्या बाहेर अशा पद्धतीने मार्किंग केले नसेल, त्याला पहिल्यावेळी दोन हजार रुपये, दुसऱ्यांदा पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दोनदा दंड करून देखील एखाद्या दुकानदारांने मार्किंग केले नाही, तर त्या दुकानदाराला दहा हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. आदेश काढून दोन दिवस झाले आहे. तरी या पथकाला अद्यापही एकही दंडास पात्र मिळाला नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.