पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया दि. ४ जून रोजी होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून आढावा, तयारी केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने काही आदेश जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रात आणि १०० मीटर परिसरात सदर वेळेत मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे व वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
मतदारसंघ आणि मतमोजणी ठिकाण
मावळ – बालेवाडी स्टेडियम
पुणे आणि बारामती – एफसीआय गोडावून कोरेगांव पार्क
शिरुर – स्टेट वेअरहाऊस, गोदाम क्र., रांजणगाव (कारेगांव)