नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वत्रच लॉकडाऊन केले असतानाच नगर शहरातील तपोवन रस्त्यावरील राजनंदिनी हॉटेल अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, त्यामधून लाखो रुपयांच्या दारूवर डल्ला मारला आहे.
तपोवन रस्त्यावरील प्रशांत निमसे यांचे राजनंदिनी हॉटेल आहे. रविवारी (दि.19) रोजी रात्री दोघा अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यातील लाखो रुपयांची दारू त्यांनी लंपास केली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून मुलाणी, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक सोळखी हे घटनास्थळी दाखल झाले.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोघे भामटे दारू चोरताना दिसत आहे. तसेच घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात निमसे यांच्या सांगण्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.