मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजुबेन (राजेश्वरी प्रदीप शाह) यांचे सोमवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. राजुबेन यांचे काही महिन्यांपूर्वी फुफ्फुस प्रत्यारोपण झाले होते.
अहमदाबाद येथील रुग्णालयात फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि नंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले. गेल्या आठवड्यात अमित शाह यांनी त्यांची दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही त्यांची भेट घेतली होती.
अमित शहा आज गुजरातमध्ये दोन सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. एक कार्यक्रम बनासकांठा जिल्ह्यातील देवदार येथील बनास डेअरी आणि दुसरा गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात होता. अमित शहा बनास डेअरीच्या विविध प्रकल्पांचे आणि उत्पादनांचे लोकार्पण करणार होते आणि जनसभेला संबोधित करणार होते. दरम्यान, बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी त्याचे दोन दिवसांताील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.