IND vs AFG 2nd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित आणि कंपनीने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक खेळीमुळे टीम इंडियाने 15.4 षटकात 173 धावांचे लक्ष्य गाठले. 14 महिन्यांनंतर टी-20मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले. या खेळीसह विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
17 धावा करताच गाठला महत्वाचा टप्पा…
खरं तर, 29 धावांच्या खेळीत 17 धावा केल्यानंतर विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना दोन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने ही कामगिरी केली होती. स्टर्लिंगने टी-20 मध्ये 83 डावात 2,074 धावा केल्या आहेत. त्याचवेळी विराटने टी-20 इंटरनॅशनलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 46 डावात 2,012 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पाठलाग करताना सर्वाधिक धावा
(1) पॉल स्टर्लिंग (IRE) 83 सामने 2074 धावा
(2) विराट कोहली (IND) 51 सामने 2012 धावा
(3) डेविड वॉर्नर (AUS) 61 सामने 1788 धावा
(4) बाबर आजम (PAK) 48 सामने 1628 धावा
(5) रोहित शर्मा (IND) 70 सामने 1465 धावा
फक्त 6 धावा दूर…
दरम्यान, या सामन्यात विराट कोहली आणखी एक मोठा विक्रम करू शकला असता. कोहली T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांपासून फक्त 6 धावा दूर होता. त्याचवेळी तो बाद झाला आणि विक्रम करण्यापासून वंचित राहिला.
#INDvAFG 2nd T20 : अक्षर पटेलची अप्रतिम कामगिरी, आपल्या नावावर नोंदवला मोठा विक्रम…
विराटने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त, तो दिल्ली, इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला आहे. कोहलीने 2007 पासून टी-20 या फॉरमॅटमध्ये 375 सामने खेळले आहेत.
त्याच्या नावावर 41.35 च्या सरासरीने 11 हजार 994 धावा आहेत. यामध्ये विराटने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. 12 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 6 धावांची आवश्यकता आहे आणि तो अफगाणिस्तानविरूध्दच्या तिसऱ्या टी-20 मध्ये ही कामगिरी करू शकतो.