मुंबई – देशातील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, (Unemployment rate in the country has zoomed to a high of 8.3 per cent in December 2022) जो 2022 मधील सर्वोच्च आहे, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्के होता, तर सप्टेंबरमध्ये तो सर्वात कमी 6.43 टक्क्यांवर होता आणि ऑगस्टमध्ये 8.28 इतका झाला होता आता तो आणखी वाढला आहे. 2022 च्या शेवटच्या महिन्यात शहरी बेरोजगारीचा दर 10 टक्के होता, तर ग्रामीण बेरोजगारी दर 7.5 टक्के होता.
देशाच्या विविध राज्यांमधील बेरोजगारीच्या प्रमाणाचा विचार केला तर डिसेंबरमध्ये हरियाणामध्ये बेरोजगारी सर्वाधिक होती. तेथील बेरोजगाराचा दर तब्बल 37.4 टक्के इतका आहे. त्यानंतर राजस्थान 28.5 टक्के, दिल्ली 20.8 टक्के, बिहार 19.1 टक्के आणि झारखंड 18 टक्के असे क्रमवारीनुसार अन्य राज्यांचे बेरोजगारीचे प्रमाण आहे.
देशातील महागाईचे प्रमाण वाढत असतानाच बेरोजगारीचे प्रमाणही वाढत असल्याने हे देशाच्या अर्थकारणाचे विपरीत परिणाम दर्शवत आहेत असे सांगितले जाते. देशाच्या अर्थकारणाचे अन्य आकडे आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे काही प्रमाणात संकेत देत असले तरी त्यातून रोजगार निर्मीती मात्र पुरेशा प्रमाणात होत नाही हे स्पष्ट होते आहे.
मनुष्यबळ विकास क्षेत्रातील काहीं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या स्थितीत नजिकच्या काळात फार लक्षणीय बदल होईल अशी शक्यता दिसत नाही. महागाईचा दबाव लक्षात घेता बांधकाम, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात वाढ झालेली नाही ही बाब लक्षात घ्यावी लागेल असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.