भोर (प्रतिनिधी) – तालुक्यात प्रत्येक निवडणुकीला तरुणांना औद्योगिक वसाहतीचा शब्द दिला जातो. हाच अजेंडा प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरवून प्रतिनिधी विजय मिळवतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधीच्या आश्वासनांनंतर तालुक्यातील तरुण शांत राहतात. मात्र, आता होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असल्याने कळीचा मुद्दा ठरला आहे.
बेरोजगारीमुळे भोर सोडलेल्या भोरकरांनी भोर शहराच्या चौका चौकात बॅनरबाजी करून त्यावर आता एमआयडीसीचा गाजर करूया आता बदलाचा जागर असे लिहून तरुणांनी संताप व्यक्त केला आहे.
भोर विधानसभा मतदार संघात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद , पंचायत समिती या प्रत्येक निवडणुकीला तरुणांच्या रोजगाराचे आश्वासन दिले जाते. परंतु आता भोर तालुक्यातील तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून नको आता एमआयडीसीचं गाजर करूया आता बदलाचा जागर, अशा आशयाचे पोस्टर्स आता भोर शहरातील चौका, चौकात विविध ठिकाणी झळकत आहेत.
तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर प्रत्येक निवडणुकीत मताच्या राजकारणासाठी प्रत्येक पक्षाचा अजेंडा ठरलेला असतो . भोर तालुक्यातील औद्योगीकरण उभारण्यात प्रत्येक वेळी निवडणूक आली की औद्योगिकीकरणाचे गाजर दाखवण्याचे काम राजकीय नेत्यांकडून केले जाते.
विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक, असो निवडणुकीच्या वेळी भोर तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांना आठवण येते ती म्हणजे भोरच्या एमआयडीसीची! भोरच्या एमआयडीसीचा मुद्दा घेऊन ऐन निवडणुकीच्या वेळी सर्वच पक्षीय नेते मंडळी सभा गाजवत असतात. भोर व राजगड तालुक्यात एमआयडीसी नसल्याने रोजंदारीचा गंभीर प्रश्न आहे.
हे दोन्ही तालुके आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. भोरच्या शेजारी खंडाळा एमआयडीसी आहे. भोरचा बरचसा तरुण वर्ग याठिकाणी रोजी रोटीसाठी पायपिट करत आहे. या ठिकाणी जाण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास दुचाकीने करावा लागत असल्याने इंधनाचा खर्च परवडत नाही. परंतु परवडत नसतानाही तुटपंज्या पगारावर नाइलाजास्तव राबवत असल्याचे वास्तव आहे.
चौका,चौकात गाजर…
याच कारणावरून येत्या निवडणुकीत भोर औद्योगिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भोर तालुक्यात चौपाटी, चौका चौकातून बेरोजगारीमुळे भोर सोडलेल्या भोरकरांनी होर्डिंग लावून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना लक्ष केले आहे. त्यामध्ये नको आता एमआयडीसीचं गाजर करूयात आता बदलाचा जागर अशा आशयाचे मजकूर अधोरेखित केला आहे.