इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये संसदीय आणि प्रांतीय विधीमंडळांसाठी काल झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्तारुढ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. संसदेतील आणि प्रांतीय विधीमंडळांमधील मिळून एकूण २१ जागांसाठी काल पोटनिवडणूक झाली होती.
त्यापैकी संसदेच्या किमान २ आणि प्रांतीय विधीमंडळांतील १० जागांवर पीएमएल-एनला विजय मिळाला असल्याचे आज अनधिकृत सूत्रांद्वारे मिळालेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे.
पंजाब, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील संसदेसाठीच्या प्रत्येकी दोन जागा, सिंधमधील एक जागा तर पंजाब विधीमंडळातील १२, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील प्रत्येकी २ जागांवर पोटनिवडणुकीसाठीचे मतदान झाले. त्यापैकी संसदेच्या २ जागांवर पीएमएल-एनला विजय मिळाला.
तर अन्य पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली. प्रांतीय विधीमंडळाच्या एकूण १६ जागांपैकी पीएमएल-एनला १० जागा मिळाल्याचे वृत्त आहे. त्यात पंजाबमधील ९ आणि बलुचिस्तानमधील एका जागेचा समावेश असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
पीएमएल-एन, पीपीपी आणि पीटीआयच्या पाठिंब्यावर एसआयसीने या निवडणुकीत भाग घेतला. मात्र जमियत उलेमा ए इस्लाम फजी या पक्षाने या पोटनिवडणुकीवर बहिष्कार घातला होता.
काल झालेल्या मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तर कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतातील १३ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट स्थगित करण्यात आले होते.