सातारा जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपशाला जोर

“महसूल’ गोळा करुन घरादारासह पै-पाहुण्याच्या भरभराटीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष

सातारा: कराडपासून ते शिरवळपर्यंत आणि माण-खटावपासून ते जावलीपर्यंत सर्वच ठिकाणी ओढ्यांसह नदीपात्रात अनधिकृत बेसुमारस वाळू उपासा होत आहे. याबाबतची माहिती असतानाही महसूल विभागाच्या तलाठ्यापासून ते सर्कल आणि वरिष्ठांकडून केवळ जुजबी कारवाई केली जात आहे. विशेषत: दाखविण्यासाठी एखाददुसरी कारवाई करत इतर वाळू ठेकेदारांकडून एका वाहनासाठी ठराविर रक्कमेची मंथली घेण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी सुरु केला असून गोळा केला जाणार महसूल हा शासनाच्या तिजोरीत जाण्याऐवजी आपआपल्या घरादारासह पै-पाहुण्यांच्या भरभराटीसाठी वापरला जात असल्याची जोरदार चर्चा संबंधित ठिकठिकाणी जोरदार सुरु आहे. दरम्यान, तलाठ्यापासून ते सर्कलपर्यंत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही सर्वसामान्यांमधून जोर धरत आहे.

कृष्णा नदीपात्रात धोम धरणापासून कराडपर्यंत तसेच उरमोडी, वेण्णा, कोयना या नदी पात्रांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्यासाठी अधिकृत ठेकेही काढले जातात. मात्र, खरच शासनाच्या नियमानुसार संबंधित ठेकेदाराकडून वाळू उपसा होता का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. याशिवाय अनेकजण कोणताही ठेका नसताना, कसलीही परवानगी न घेता ओढे, नदीपात्रांमध्ये वाळू उपसा करत आहे. याप्रकरणी वारंवार वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध होत असतात. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले महसूलचे अधिकारी दाखविण्यापुरती एखाद-दुसरी कारवाईही करतात आणि सुरु असलेल्या मंथलीमध्ये आणखी वाढ करुन शासनाचा माहित नाही पण स्वत: महसूल कसा वाढेल यावर भर देतात.

कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातून वाहत असलेल्या सर्वच नदीपात्रांमधील वाळू उपसण्यात तरुणाईची मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे नेते मंडळीच्या आशीर्वाद घेऊन हीच तरुणाई शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही अगदी बरोबर मॅनेज करत असल्याने “तेरी भी चुप, मेरी भी चुप’ अशीच काहीशी परिस्थिती अनधिकृत वाळू उपशांबाबत सुरु आहे. मात्र, दिवसेंदिवस सुरु असलेला बेसुमार वाळू उपसा हा नद्यांच्या मुळावर उठला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक दुर्घटना घडत आहे. याशिवाय भविष्यात नद्या आपले पात्र बदलण्याचीही शक्‍यता नाकारता येत नसल्याने आता जिल्हाधिकारी अथवा मंत्र्यांनीची या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र या वरिष्ठांनी तरी कारवाई दरम्यान कोणताही स्वार्थ न ठेवता कारवाई होण्याची माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे एवढचं.


मालमत्तेच्या चौकशीची मागणी

महसूल विभागात काम करत असणाऱ्या तलाठी, मंडलाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांकडून वाळू उपशावर दिखाव्यासाठी कारवाई केली जात आहे. तसेच कारवाईची भीती घालून वाळू ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याचा आरोप संबंधित वाळू उपसा होत असलेल्या परिसरातील गावांमधील ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ज्या भागात वाळू उपसे होतात त्या त्या भागात नेमणुका असलेल्या तलाठी, मंडलाधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.