मुंबई – अल्टिमेट खोखो स्पर्धेतील मुंबई फ्रॅंचायझी यांनी आपल्या संघाचे नामकरण मुंबई खिलाडीज असे केले आहे. तसेच या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राजेंद्र साप्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई खिलाडीज संघाचे सहमालक पुनीत बालन व रॅपर बादशाह यांनी संघाचे नामकरण आणि मुख्य प्रशिक्षक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
राजेंद्र साप्ते यांच्यासारखा अनुभवी प्रशिक्षक मिळणे हा आमच्यासाठी बहुमानच असल्याचे सांगून बालन म्हणाले की, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आमच्यासाठी नक्कीच मौल्यवान ठरेल.
बादशाह यांनी यावेळी सांगितले की, मुंबईतील क्रीडा संस्कृती किती समृद्ध आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, म्हणूनच या संघाचे नाव मुंबई खिलाडीज असे ठेवण्यात आहाला विशेष आनंद झाला आहे. हा संघ प्रत्येक सामन्यात सर्वस्व पणाला लावून कामगिरी बजावेल, अशी आमची खात्री आहे.
राजेंद्र साप्ते यांना प्रशिक्षकपदाचा 21 वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ अनुभव असून रत्नागिरी जिल्ह्यापासून सुरुवात केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक दिलेल्या अनेक खेळाडूंनी किशोर(युवा), कुमार व वरिष्ठ गटाच्या राज्य, राष्ट्रीय व अखिल भारतीय विद्यापीठ स्तरापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. एप्रिल 2016 साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या, तसेच 2018 साली आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचेही ते प्रशिक्षक होते.
मुंबई खिलाडीज संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यामुळे आपल्याला आनंद झाल्याचे सांगून राजेंद्र साप्ते म्हणाले की, अल्टिमेट खो खो स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून क्रीडाक्षेत्रात यामुळे क्रांती घडून येणार आहे. इतकेच नव्हे तर भारतातील गुणवान व उदयोन्मुख खो खो खेळाडूंना त्यामुळे एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळणार आहे.