भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुजरात जायंट्स व ओडिशा जगरनॉट्समध्ये प्रचंड धुमचक्री पहायला मिळाली. गुजरात जायंट्सने यजमान ओडिशा जगरनॉट्सवर रोमहर्षक सामन्यात २ गुणांनी विजय मिळवला.
साखळी गुणतालिकेत १०-१० सामन्यांनंतर ओडिशा जगरनॉट्स २३ गुणांसह दुसऱ्या तर गुजरात जायंट्स २१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या या तुल्यबळ संघांत आज पहिला उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात गतविजेत्या गुजरात जायंट्सने व ओडिशा जगरनॉट्सवर २९-२७ असा दोन गुणांनी रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. नेहमीपेक्षा थोडी वेगळी रणनीती आखत ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेतले तर गुजरात जायंट्सला संरक्षणासाठी आव्हान दिले. प्रत्येक टर्न ७ मिनिटांची खेळली जाते.
Gujarat put a 𝕘𝕚𝕒𝕟𝕥 stride into the final 🔥#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/rRBJ2QLO98
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 11, 2024
शेवटच्या व चौथ्या टर्न वेळी ओडिशा जगरनॉट्सने गुजरातवर २४-१९ अशी ५ गुणांची नाममात्र आघाडी घेतली जी पहिल्या टर्न इतकीच होती व हे आव्हान गुजरात जायंट्स साठी अवघड नव्हते. पण ओडिशा जगरनॉट्सच्या एम के गौतम व दिलीप खांडवीने शेवटी शेवटी दिलेल्या जोरदार लढतीने हा सामना रोमहर्षक ठरला. ओडिशा जगरनॉट्सच्या पहिल्या तुकडीतील दिपेश मोरेला सुयश गरगटेने स्वस्तात बाद केले, ओंकार सोनवणेला पबनी साबरने आकाशीय सूर मारत बाद केले तर तुकडीतील शेवटचा खेळाडू बी. निखीलला संकेत कदमने सहज स्पर्शाने बाद केले व ओडिशा जगरनॉट्सला ड्रीम रन मिळू दिला नाही व हि तुकडी तीन मिनिटात बाद झाली.
The Giants have booked their place in the FINAL 🤩#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/kXCNCy8EAa
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 11, 2024
दुसऱ्या तुकडीतील विशालला संकेत कदमने सहज स्पर्शाने बाद केले. तर एम के गौतमला सुयश गरगटेने सहज स्पर्शाने बाद केले त्यापूर्वीने एक ड्रीम रन मिळवून दिला. तर शेवटी दिलीप खांडवीने दोन ड्रीम रन्स मिळवून देत नाबाद राहिला पण त्यापूर्वीच गुजरात जायंट्सने ओडिशा जगरनॉट्सवर २९-२७ असा दोन गुणांनी रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला व त्याच बरोबर पहिल्या सीजन मध्ये झालेल्या पराभावाच बदला सुध्दा घेतला.
त्यापूर्वी झालेल्या पहिल्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सने पॉवर प्लेने सुरवात केली (यात दोन वजीर घेऊन खेळू शकतो व वजीर कधीही कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. त्याला दिशेचे नियम लागू होत नाहीत.) गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील अविनाशच्या कल्पक खो देत सुयश गरगटेला बाद करण्याचा ओडिशा जगरनॉट्सच्या आक्रमकांनी जोरदार प्रयत्न केला मात्र तो फसला त्यानंतर सुयश गरगटेला (२ मि. संरक्षण) व त्यानंतर थोड्याच वेळात शुभम थोरातला (१.५० मि. संरक्षण) एम के गौतमने सहज स्पर्शाने बाद केले. त्यापूर्वी शुभमने संघाला ४ ड्रीम रन्स मिळवून दिले (संरक्षण करताना कोणतीही तुकडी तीन मिनिटे संरक्षण केल्यानंतर त्या टीमला १ ड्रीम रन मिळतो व ती संपूर्ण तुकडी बाद होईपर्यंत प्रत्येक ३० सेकांदा नंतर पुन्हा १-१ गुण मिळवता येतो). त्यानंतर दिपक माधवला सुध्दा एम के गौतमने सहज स्पर्शाने बाद केले मात्र दिपकने सुध्दा एक ड्रीम रन मिळवून दिला व पहिली तुकडी एम के गौतमने ने परत धाडली ती ५.१३ मिनिटानंतर. दुसऱ्या तुकडीतील पी. नरसय्याला अविनाश देसाईने स्तंभात बाद केले तर राम मोहनला सुशांत काळढोणेने सहज स्पर्शाने बाद केले व त्यावेळी ओडिशा जगरनॉट्सने गुजरातवर १०-५ अशी ५ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.
दुसऱ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनी सुध्दा पॉवर प्लेने सुरवात केली व दमदार आक्रमण सुरु केले. ओडिशा जगरनॉट्सच्या पहिल्या तुकडीतील विशालला सहज स्पर्शाने बाद केले तर दिलीप खांडवीला राजवर्धन पाटीलने स्तंभात बाद केले, एम के गौतमला सुयश गरगटेने सहज बाद करत पहिल्या तुकडीचा सफाया लवकर केला व पहिली तुकडी २.४१ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील अविनाश देसाईला व्ही. सुब्रमणिने सहज स्पर्शाने बाद केले, सुशांत काळढोणेला संकेत कदमने सहज स्पर्शाने बाद केले, तर रोहन शिंगाडेला सुध्दा लवकर बाद करण्यात गुजरात जायंट्सने यश मिळाले व हि तुकडी ५.२२ मिनिटात बाद झाली. तर मनोज कुमारला सुध्दा लावर बाद करण्यात गुजरात जायंट्सने यश मिळाले. मध्यंतराला गुजरात जायंट्सने ओडिशा जगरनॉट्सवर १९-१० अशी नऊ गुणाची आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सने गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील फैजंखा पठाणला अविनाश देसाईने आकाशीय सूर मारत बाद केले, अभिजित पाटीलला मनोज पाटीलने सहज स्पर्शाने बाद केले तर कर्णधार अक्षय भांगरेला कर्णधार दिपेश मोरेने सहज स्पर्शाने बाद करत एक ड्रीम रण वाचवला व हि तुकडी ३ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील व्ही. सुब्रमणिला अविनाश देसाईने आकाशीय सूर मारत बाद केले, पबनी साबरला दिपेश मोरेने सहज स्पर्शाने बाद केले. संकेत कदमला (१.१३ मि. संरक्षण) दिलीप खांडवीने सहज स्पर्शाने बाद केले व हि तुकडी ५.०६ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील सुयश गरगटेला सुशांत काळढोणेने आकाशीय सूर मारत बाद केले. या सामन्यात संकेत कदमला उत्कृष्ट आक्रमक, सुयश गरगटेला उत्कृष्ट संरक्षक तर एम के गौतमला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.