Moscow Concert Hall Attack । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर १५० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री १२ अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस या दहशतवादी गटाने स्वीकारलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतरचा हा मोठा हल्ला घडलाय.
15 ते 20 मिनिटं गोळीबार सुरू Moscow Concert Hall Attack ।
मॉस्कोमध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक आले होते. त्यावेळी अचानक १० ते १२ हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये 40 टक्के भाग जळून खाक झाला.
महत्त्वाचं म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना आम्ही रशियाला 7 मार्च रोजीच दिली होती असं अमेरिकेने म्हटलंय. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेने केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये हल्लेखोर दिसतायेत Moscow Concert Hall Attack ।
सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडीओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो. एका व्हिडीओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत. क्रोकस हॉलच्या छतावरून ज्वाळा उठताना दिसत आहेत.
50 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना
मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर 50 रुग्णवाहिका टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या.मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून 100 लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.
हल्ल्याशी आमचा संबंध नाही – युक्रेन
दरम्यान, रशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत युक्रेनचे वक्तव्य आलंय. मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबार आणि स्फोटात युक्रेनचा सहभाग नसल्याचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.