मुंबई : महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण दिले आहे.
उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याआधीही ठाकरे कुटुंबाच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात राज यांनी साथ दिली आहे.