मुंबई – महासाष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यात या मुद्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर ठाकरे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर संदर्भात गाइडलाइन्स बनवण्यासाठी घेण्यात येणार आहे. याबैठकीस जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्याची सहमती दिली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीस उपस्थित नसणार आहेत.
ठाकरे सरकाकडून घेण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत भाजपकडून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसेकडून बाळा नांदगावकर,संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अन्य काही छोट्या पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
आजची ही सर्वपक्षीय बैठक राज्याच्या गृहविभागामार्फत भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भोंग्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या भूमिका समजून घेत राज्य सरकारची भूमिका काय आहे हे या बैठकीत मांडलं जाणार आहे.
दरम्यान, मनसेकडून मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी रमजान ईद म्हणजेच 3 मे पर्यंतचा अल्टीमेट ठाकरे सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक घेतली जात आहे.