मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांकडून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर तिखट शब्दात टीका केली. मात्र हे करतेवेळी त्यांनी ज्या शब्दांचा उपयोग केला त्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेने भाजपा या एका महिलेच्या सांगण्यावर नाच्या पोरांसारखा नाचत असल्याचा टोला लगावला आहे. दरम्यान शिवसेनेने सामना अग्रलेखात वापरलेल्या भाषेवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी जाहीर केली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत ‘बाई’ शब्दाचा वापर करत अनादर केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. “बाई या शब्दाचा इतका अनादर? अतिशय किळसवाणं”, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखात “भारतीय जनता पक्षाने सध्या हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा एक संस्कार आणि संस्कृती आहे, धिंगाणा नाही. अमरावतीचे राणा दाम्पत्य हे अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील त्याचा भरवसा नाही.
श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईंचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे,” अशा कठोर शब्दांमध्ये शिवसेनेने भाजपावर सामनामधून निशाणा साधला आहे.