आरेचे नाणार होणार – उद्धव ठाकरे

कारशेडवरून शिवसेना-भाजपात ठिणगी उडण्याची शक्‍यता
मुंबई: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडवरून राजकारण तापले आहे. आरेतील हजारो झाडे तोडून उभारण्यात येणाऱ्या कारशेडला पर्यावरणप्रेमींनी विरोध करीत मुंबईत आंदोलन छेडले असतानाच त्याला आता शिवसेनेही टोकाचा विरोध केला आहे. कोकणातील नाणार प्रकल्पाचे जे झाले तेच आता आरे मेट्रो कारशेडचेही होणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे कारशेडवरून शिवसेना आणि भाजपात ठिणगी उडण्याची शक्‍यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आरेमधील मेट्रो कारशेडबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आरेतील झाडे तोडण्याला पर्यावरण प्रेमींकडून विरोध होत असतानाच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील या वृक्षतोडीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपण आदित्य ठाकरेंशी चर्चा करून मार्ग काढू असे स्पष्ट केले होते. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी आता जे नाणारचे झाले तेच मेट्रो कारशेडचेही होणार अशी भूमिका मांडल्याने आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा अधांतरीच राहणार आहे.

शिवसेनेकडून कोण कुठल्या जागेकडून इच्छुक आहे, कोणत्या जागेसाठी मुलाखती सुरू आहेत याची माहिती अद्याप मला नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मी आढावा घेईन, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानची स्तुती करणारे वक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता, मला त्यांच्याबाबत काही बोलायचे नाही. सर्वसामान्य जनतेला या वक्त्‌व्याबाबत जे वाटते तेच मलाही वाटते. गेल्या निवडणुकीत जनतेने यामुळेच त्यांचा पराभव केला होता.मात्र आमच्यासाठी देशभक्ती सर्वोच्च असल्याचेही ते म्हणाले.

राममंदिराबाबत सरकारने धाडसी पाउल उचलावे
राममंदिराबाबत शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती. न्यायालयात हा खटला आता अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहेच. पण आता किती दिवस वाट पहायची कलम 370 प्रमाणेच केंद्र सरकारने या विषयावरही धाडसी पाउल उचलावे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राममंदिराची पहिली वीट रचण्याची संधी मिळाली तर तो आमचा बहुमानच असेल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)