“लाली’ एकांकिका ठरली “पुरुषोत्तम’ची मानकरी

“फ्याड’ एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचे, तर “टॅंजेन्ट’ला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक

पुणे -“अरे आव्वाज कोणाचा’, “करंडक कोणाचा’, “हिप हिप हुर्रे’ अशा दणदणाटात सलग तिसऱ्या वर्षी नगर जिल्ह्याने पुरुषोत्तम करंडक पटकावला. “न्यू आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या “लाली’ या एकांकिकेने “पुरुषोत्तम’वर नाव कोरले. “बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या “फ्याड’ या एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचा “हरि विनायक करंडक’, तर “श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “टॅंजेन्ट’ या एकांकिकेला तिसऱ्या क्रमांकाचा “संजीव करंडक’ मिळाला. तर टिळक आयुर्वेद महाविद्यालयाला “फिर्याद’ या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट आयोजित संघाचे “भालचंद्र मानचिन्ह’ मिळाले.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे घेण्यात येणारी पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिर येथे झाली. मंगेश कदम, लीना भागवत आणि दिगंबर निघोजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण 19 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. तर डिसेंबरमध्ये होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी विजयी संघाच्या सरावांना वेग आला आहे.

सांघिक करंडकांसह नगरच्या महाविद्यालयाने वैयक्तिक पारितोषिकांवर ठसा उमटवला. संकेत जगदाळे (अभिनय नैपुण्य), कृष्णा वाळके (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), रेणुका ठोकळे (उत्तेजनार्थ अभिनय) यांनी पारितोषिके जिंकली. यासह काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश सुतार (सर्वोत्कृष्ट अभिनय), वैभव काळे (उत्तेजनार्थ दिग्दर्शक, अभिनय), मृणाल तारे (उत्तेजनार्थ अभिनय) यांनी करंडकावर बाजी मारली. तर स. प. महाविद्यालयाच्या नाथ पुरंदरे (वाचिक अभिनय), रितिका श्रोत्री (अभिनय उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोजिक लेखक) यांनी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आर्या घाडगे (अभिनय नैपुण्य), शरद पैलवान, राजकिरण साबळे(दिग्दर्शक उत्तेजनार्थ), श्रद्धा माने, स्वप्नील चव्हाण (अभिनय उत्तेजनार्थ) यांनी, फर्गसन महाविद्यालय – प्राजक्‍ता बापट (अभिनय उत्तेजनार्थ), गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या सोहम फालगावकर (अभिनय उत्तेजनार्थ) यांनी अप्पासाहेब जेधे वाणिज्य महाविद्यालयाच्या सुनील शिंदे, ओंकार तारू (अभिनय उत्तेजनार्थ) यांनी, विश्‍वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय नचिकेत कुलकर्णी, स्वप्निल वाघोलीकर (सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोजिक लेखक) यांनी पारितोषिके पटकावली.

“हरवणाऱ्या गोष्टी शोधण्यापेक्षा, हरवत चाललेल्या गोष्टी जपूया’ या संकल्पनेवर “लाली’ ही एकांकिका सादर केली आहे. सलग तिसरा “पुरुषोत्तम करंडक’ जिंकल्याने नगरकरांचा अभिमान वाटतो. नाटक ही “व्यक्‍त’ होण्याची कला असल्याने सादरीकरण करताना जिवंतपणा येतो. आता महाअंतिम फेरीसाठी वैचारिक तयारी पूर्ण झाली आहे. त्याही फेरीमध्ये “प्रथम क्रमांक’ पटकावण्याचा आमचा मानस आहे.
– कृष्णा वाळके, दिग्दर्शक, “लाली’


ग्रामीण आणि शहरी भागांतील दोन जोडप्यांचे नाते सांगणारी ही एकांकिका आहे. “हरि विनायक करंडक’ जिंकल्याचा खूप आनंद आहे. महाविद्यालयातील डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे अशा दिग्गज कलाकारांची परंपरा पुढे सुरू आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– वेदा बडीये, विद्यार्थी प्रतिनिधी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Leave A Reply

Your email address will not be published.