सांगली – इस्लामपूर येथील त्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामध्ये इस्लामपूर येथील दोन महिला व कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. या तीनही महिला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत.
इस्लामपूर येथील त्या दोन महिलांमधील एक महिला बाधित कुटुंबातील आहे, तर दुसरी कामवाली आहे. पेठ वडगावची महिला बाधित कुटुंबाची नातेवाईक आहे. जिल्ह्यातील करोनाबधितांची संख्या तीन दिवसांत १२ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी ही माहिती दिली.
करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबातील व संपर्कातील ११ व्यक्तींचे व अन्य एक अशा एकूण १२ व्यक्तींच्या नमुने तपासणी अहवालाकडे आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी रात्री उशिरा ११ व्यक्तींच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ३ महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, तर ८ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत.