मुंबई – भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा तिसऱ्या चंद्र मोहिमेला यशस्वीपणे सुरूवात झाली आहे. इस्रोचे चांद्रयान-3 शुक्रवारी चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. आता त्याचा चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास सुरु झाला आहे. देशासह संपूर्ण जगाचे लक्ष “मिशन मून’कडे लागले आहे. देशाला अभिमान वाटावा अशा या मोहिमेत महाराष्ट्राचीही मोठी भागिदारी आहे. चांद्रयान-3 चा महत्त्वाचे भाग मुंबई आणि सांगलीत बनवण्यात आले आहेत. तसेच बुलढाणा येथील चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान-3मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय पुण्याच्या जुन्नरमधील दोन सुपुत्रांनी चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले चार बूस्टर इंदापूरमधील वालचंदरनगर कंपनीने तयार केले आहेत. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यानासाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इस्रोला इंजिनासह काही महत्त्वपूर्ण भाग पुरवले आहेत. इंजिनासाठीचे हे महत्त्वाचे भाग गोदरेजच्या मुंबई येथील विक्रोळी प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहेत. गोदरेज कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविले आहेत. गोदरेज एरोस्पेसने या योगदानांसह चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशासाठी महत्त्वाकांक्षी आणि अभिमानास्पद असलेली या मोहिमेत राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दोन वस्तूंचा खारीचा वाटा आहे. खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात आला आहे. खामगाव येथील चांदी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. ही चांदी वजनाने हलकी असल्याने चांद्रयान-3 मध्ये याचा वापर करण्यात आला आहे. खामगावची चांदी ही शुद्ध असल्याने चांद्रयान-3 साठीच्या स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे. खामगाव येथीलच विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चांद्रयान-3 साठी लागणाऱ्या थर्मल शील्ड पुरवले आहे. चांद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सने तयार केला आहे. या मोहिमेमध्ये पुण्याच्या इंदापूरमधील वालचंदनगर कंपनीचाही मोलाचा वाटा आहे. चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले चार बूस्टर वालचंदरनगर कंपनीने तयार केले आहेत. या बूस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेच्या पहिल्या स्टेजसाठी याचा उपयोग होतो. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्त्वाच्या उपकरणांचा समावेश आहे. यापूर्वी, “चांद्रयान-2’साठीही सहा बूस्टर तयार करण्याचे काम वालचंदनगर कंपनीने केले होते. सांगलीजवळील माधवनगरच्या एका कंपनीने चांद्रयान-3चे इंधन निर्मितीसाठी लागणारा भाग तयार केला आहे. जीएसएलव्ही यानाचा एक भाग सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस् या खासगी कारखान्यात तयार करण्यात आला आहे. अंतराळ यानाला प्रक्षेपणानंतर जे इंधन आवश्यक आहे ते तयार करण्यात येणाऱ्या भागाला संरक्षण आणि साठवण करणाऱ्या उपकरणाची निर्मिती या कारखान्यात करण्यात आली. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम या कंपनीमध्ये होत आहे.