वॉशिंग्टन: करोना विषाणूच्या समस्येच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना चीनच्याच बाजूने आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. करोना विषाणूमुळे उत्पन्न झालेली स्थिती चीनकडून कशाप्रकारे हाताळली गेली याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून अगदी अयोग्य पद्धतीने चीनचे कौतुकच केले आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी चीनबरोबर जागतिक आरोग्य संघटनेवरही टीका केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनला झुकते माप दिले असल्याचा आरोप सिनेटमधील रिपब्लिकन सदस्य मार्को रुबिओ यांनी केला होता. त्या आरोपावरील प्रश्नाला अध्यक्ष ट्रम्प उत्तर देत होते.
कॉंग्रेस सदस्य मायकेल मॅकौल यांनीही “डब्लूएचओ’च्या प्रामाणिकपणावरच शंका उपस्थित केली. संघटनेचे महासंचालक टेड्रोस ऍधानोम घेब्रेयसस यांच्या चीनबरोबरच्या संबंधांबाबत पूर्वीही इशारे दिले गेले होते, असे ते म्हणाले.
“डब्ल्यूएचओ चीनची बाजू घेत आहे. बरेच लोक त्याबद्दल खूश नाहीत, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले. करोना विषाणूची साथ नियंत्रित झाली की “डब्ल्यूएचओ’ आणि चीनला त्याचे परिणाम भोगावे लागले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
करोनाचा उद्रेक संपविण्याच्या दृढनिश्चयासाठी “डब्ल्यूएचओ’चे महासंचालक घेब्रेयसस यांनी चीनच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. त्याबद्दल यांच्यावर टीका व्हायला लागली आहे. करोनाच्या उद्रेकाबाबत चीनला दोष न देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.