पुणे -रिक्षाला धडकून खाली पडल्याने समोरून आलेल्या पीएमपीच्या चाकाखाली सापडून दूध व्यवसायिक तरुण ठार झाला. हा अपघात टिळक रस्त्यावर झाला. आकाश तुकाराम विधाते (24, रा. बाणेर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा बाणेर परिसरात राहण्यास होता. त्यांचा दुधाचा व्यवसाय असून आकाश कुटूंबियांना मदत करत होता. तो दुपारी कामानिमीत्त दुचाकीवरून अलका थिएटरकडून स्वारगेटकडे जात होता.
लिमयेवाडी बोळीतून दुर्वांकुर हॉटेलजवळ दुचाकीवरून येत असतानाच अचानक समोरून आलेल्या रिक्षाला धडक झाल्याने आकाश खाली पडला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएल बसखाली आकाश आल्याने जागीच ठार झाला.
तो दुचाकीसह बस खाली जाताच नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.