कराड – कराड शहरालगतच्या बारा डबरी परिसरातील शिंदे मळ्यात डॉक्टरांच्या बंगल्यावर सहा ते सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी पोलिसांनी अंबरनाथ येथे एकास सापळा रचून ताब्यात घेतले. तर आणखी एकास ताब्यात घेतल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. कुलदीपसिंग असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर ताब्यात घेतलेल्या दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. राजेश शिंदे व त्यांच्या पत्नी पूजा शिंदे या इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने होलीस्टींग हिलिंग सेंटर चालवत असून याच हॉस्पिटलच्या पाठीमागील बंगल्यात ते वास्तव्यास आहेत. सोमवार, दि. 10 रोजी या बंगल्यावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी 27 लाखांची रोकड व 48 तोळयांचे दागिने असा सुमारे 46 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान, पोलिसांनी पाच पथके तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. इतर दरोडेखारांचा तपास सुरु असून तेही लवकरच सापडतील असे पोलिसांनी सांगितले.