ओतूर – येथे 24 तासांत करोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव 14 दिवस क्वारंटाइन केले असून कंटेन्मेंन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते. गावात बाधित आढळल्यानंतर संचारबंदी कलम 144 ची कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले आहे.
ओतूर गावठाण अंतर्गत शुक्रवारी (दि.5) करोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आहेत. पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण हा 15 दिवसांपूर्वी पुण्याहून ओतूरला आला होता, दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागल्याने त्याला लेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या 24 तासांत दोन झाली आहे.
तहसीलदार कोळेकर यांनी तातडीची बैठक आयोजित करून सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गावात येणारे सर्व प्रमुख मार्ग बंद केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली आहेत. पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सरपंच संतोष तांबे, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, उपसरपंच डॉ. सुनीता वेताळ, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तानाजी तांबे, शिवसेना समन्वयक संभाजी तांबे, शरद सहकारी बॅंकेचे संचालक विनायक तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानूविलास गाढवे, माजी उपसरपंच रईस मणियार, ग्रामपंचायत सदस्य स्मिता डुंबरे, आशिष शहा, उद्योजक जालिंदर पानसरे, प्रेमानंद अस्वार, सुमित कांबळे, जयप्रकाश डुंबरे, जी. एम डुंबरे उपस्थित होते. निवडक ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. ग्रामस्थांनी प्रतिसाद दिल्याने काही वेळातच शुकशुकाट पसरला होता.