इस्लामपूर -नानासाहेबांसारखे दानशूर व्यक्तीमत्व अनेकांना आधार अन् पाठबळ होते. महाडीक परीवाराशी पूर्वीपासून स्नेह व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नानासाहेबांशी असलेली मैत्री सांगली व सातारा जिल्ह्याला ज्ञात होती. नानासाहेबांची उणीव त्यांचे दोन्ही सुपूत्र भरून काढण्यासाठी कार्यरत आहेत. राहुल व सम्राट यांच्या सामाजिक व राजकीय जीवनात नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
पेठ नाका येथे स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या निवासस्थानी नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडीक, युवानेते सम्राट महाडीक यांनी स्वागत केले.
ते म्हणाले, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा जिल्ह्यात वाढलेल्या करोना परिस्थितीमुळे मला नानासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. नानासाहेब नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील असे त्यांचे कार्य होते. भविष्यात राहुल महाडीक व सम्राट महाडीक यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत. यावेळी इस्लामपूरचे नगरसेवक अमित ओसवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.