कोल्हापूर – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलांचे दागिने हिसकावून नेणाऱ्या परप्रांतीय टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. टोळीतील दोघा अट्टल चोरटयांना अटक केली असून जिल्ह्यातील नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच 11 लाख 60 हजार रुपयांचा सुमारे 23 तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
चंद्रकांत माने (वय 26) व शक्ती माने (वय 19, दोघे रा. माणकापूर, ता. चिक्कोडी, बेळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात पादचाऱ्या महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली होती.
त्याअनुषंगाने तपास करीत असताना पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना हे दोघे चोरटे चोरीतील सोन्याचे चिताक विक्री करण्यासाठी रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचत त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या तपासात त्यांची अंगझडतीत पाच तोळ्याचे सोन्याचे चित्ताक मिळून आले. चौकशीत त्या दोघांनी राधानगरीसह हातकणंकले पोलीस ठाण्यात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यात त्या दोघांनी नऊ चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यांची कबुली दिली.
गुन्ह्यात लखन माने (रा. माणकापूर, ता. चिक्कोडी) या संशयित साथिदाराचाही हात असल्याची माहिती पुढे आली असून त्याचा शोध सुरू आहे. या दोघा संशयितांकडून 227 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यातील मोटारसायकल असा 11 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.