सुकमा – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. ज्यांच्या डोक्यावर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस होते, त्यांना ठार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडमेतला आणि दुलेड गावांदरम्यानच्या जंगलात सकाळी 6 वाजता वेगवेगळ्या सुरक्षा दलांच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहिमेसाठी बाहेर पडले होते.
ताडमेटला-दुलेड गावांच्या जंगलात माओवाद्यांच्या जगरगुंडा क्षेत्र समितीशी संबंधित 10-12 सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी ही चकमक झाली.
जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 223 व्या बटालियनच्या जवानांनी ही कारवाई केली. जवानांच्या गस्ती पथकाने परिसराला वेढा घातला असताना दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला.
चकमक शांत झाल्यानंतर, घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. 12 बोअरची डबल बॅरल रायफल आणि एक पिस्तूलही त्यांच्या जवळून जप्त करण्यात आली.
मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे सोढी देवा आणि रवा देवा अशी आहेत. हे दोघेही माओवाद्यांच्या जगरगुंडा एरिया कमिटीमध्ये सक्रिय होते आणि त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस होते.