मुज्जफरपुर जिल्ह्यात आणखी दोन चमकीग्रस्त बालकांचे निधन

पाटणा – बिहारच्या मुज्जफरपुर आणि आसपासच्या भागात चमकी तापाने ग्रस्त बालकांच्या मृत्यंचे प्रकार अजून थांबलेले नाहीत. आज त्या जिल्हयातील आणखी दोन बालकांचे या तापाने बळी गेले. ही दोन्ही बालके एस. के मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात उपचार घेत होती. तेथेच त्यांचे निधन झाल्याने या तापाने मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या आता 153 झाली आहे. अजूनही या रूग्णालयात 431 मुलांवर उपचार सुरू असून त्यातील अनेक बालके अत्यवस्थ आहेत.

या रूग्णालयाचे अधिक्षक सुनिलकुमार शाही यांनी म्हटले आहे की आता रूग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांची संख्या कमी झाली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. ते म्हणाले की ऍक्‍युट एन्सीफलाटिस सिंड्रोम या रोगामुळे मेंदुज्वर होतो. दर उन्हाळ्यात या रूग्णांचे प्रमाण वाढते आणि पाऊस सुरू झाला की याचा प्रार्दुभाव कमी होतो असा नेहमीचा अनुभव आहे असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान त्या भागात असलेल्या कुपोषणामुळेच बालके दगावत असल्याचा आरोप काही तज्ज्ञांनी केला असून या प्रकरणी सरकारकडून मात्र काहीही हालचाल होताना दिसत नाही अशी तक्रार येथील नागरीकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.