रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांचा राजीनामा

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी आपली मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिझर्व्ह बॅंकेतील उच्चपदावर काम करणाऱ्यांनी राजीनामा देण्याचा हा सहा महिन्यातील दुसरा प्रकार आहे. या आधी डिसेंबर मध्ये गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आचार्य यांनी काही दिवसांपुर्वी सरकारच्या रिझर्व्ह बॅंकेतील हस्तक्षेपाच्या विरोधात जाहीर आवाज उठवला होता. तेव्हापासून ते चर्चेत आले होते.

सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीवर दावा सांगत तो निधी सरकारी वापरासाठी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आचार्य यांनी त्याला विरोध केला होता. ते स्वताला गरीबांचे रघुराम राजन असेही गंमतीने म्हणवून घेत असत. अत्यंत तरूण वयात त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारतात ही जबाबदारी स्वीकारण्यापुर्वी ते न्युयॉर्क विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.

स्वायत्ततेचा आग्रह धरल्यामुळे राजीनामा द्यावा लागला काय?
विराल आचार्य यांनी आरबीआयच्या स्वायत्ततेचा आग्रह धरला होता मोदी सरकारपासून त्यांना स्वातंत्र्य हवे होते त्यांच्या या भूमिकेशी त्यांचा राजीनाम्याचा काही संबंध आहे काय याचा खुलासा होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसने दिली आहे.या संबंधात पक्षाने म्हटले आहे की आपल्या पदाची मुदत संपण्याच्या आधी सहा महिने आचार्य यांचा राजीनामा आला आहे. त्यांनी आरबीआयला अधिक स्वायत्ता मागितली म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आहे काय याचा खुलासा झाला पाहिजे. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, आत्ता पर्यंत चार आर्थिक सल्लागार, आरबीआयचे दोन गव्हर्नर, आणि निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन भाजपला आरसा दाखवला आहे.

नोटबंदीनंतरच्या काळात रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांच्या ठेवी आणि पैसे काढण्याच्या निमयांमध्ये वारंवार करण्यात आलेल्या बदलांमुळे निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती. आचार्य यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण दिलेले नाही. आपल्याला पुन्हा अमेरिकेत अध्यापनाच्या कार्यासाठी जाण्याची इच्छा आहे एवढेच त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.