अकलूज -दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अकलूज-माळीनगर रस्त्यावरील सुलतान बाबा मंदिरानजवळ रविवारी (दि. 6) रात्री घडला. हरी रंगनाथ शिंदे (वय 30), प्रकाश शिवाजी लाळगे (वय 29) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, शिंदे हे मोटारसायकलने (एमएच 45 एजे 1036) अकलूजहून माळीनगरकडे येत होते.
याचवेळी विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून (एमएच 42 एडब्ल्यु 1273) लाळगे आल्याने त्यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांच्याही डोक्यास गंभीर दुखापत होऊन दोघांचाही मृत्यू झाला आहे. प्रकाश लाळगे यांच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.