साफसफाई करून प्रवेशद्वाराला लावले कुलूप
वडगाव मावळ – मावळ तहसीलदार निवासात ठाण मांडून बसलेल्या फिरस्त्याला मंगळवारी (दि. 8) महसूल विभागाने बाहेर काढले. निवास परिसराची सफाई करीत प्रवेशद्वाराला कुलूप लावले.
गेल्या दोन महिन्यांपासून तहसील निवासस्थानात फिरस्ते वास्तव्यास होते. तहसील निवासातील समस्या, अस्वच्छता यासंदर्भात “तहसील निवास फिरस्त्यांचे आश्रय’ या मथळ्याखाली दैनिक प्रभातने मंगळवारी (दि. 8) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महसूल विभागाला जाग आली आणि ठाण मांडलेल्या फिरस्त्याला बाहेर काढले. परिसराची सफाई केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले.
दैनिक प्रभातच्या या बातमीच्या प्रभावाने अखेर महसूल प्रशासनाला जाग आली. आठ वर्षांपासून धूळखात पडलेल्या तहसील निवासस्थानात धाव घेतली. त्या फिरस्त्याला निवासातून त्याच्या साहित्यासह हाकलून दिले. पुन्हा या तहसील निवासात दिसल्यावर कारवाई करण्याची तंबी दिली. या निवासात कचऱ्याचा ढीग साचला होता. पावसाने परिसर विद्रुप झाला होता. मात्र दैनिक प्रभातच्या वृत्तानंतर मंगळवारी परिसर चकाचक झाला. मावळ तहसील कार्यालयाने तत्परतेने कार्यवाही केल्याने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.