नागठाणे – नागठाणे विभागातील ज्येष्ठ पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी नागठाणे येथील तिघांवर आज गुन्हा दाखल झाला असून दोघांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक जण फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चव्हाण यांनी 5 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते. त्यांचे 12 डिसेंबर रोजी निधन झाले. या घटनेनंतर संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबीयांसह जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनेही कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
एक महिन्यानंतर आज चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांना यश आले. पोलीसांनी केलेल्या चौकशीनंतर चव्हाण यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संजय दिनकर जगताप, राजेंद्र दिनकर जगताप या संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर तिसरा संशयित राहुल राजेंद्र जगताप फरारी आहे. याबाबत वैभव संभाजी चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर तपास करत आहेत.