कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन करणाऱ्या दोघा व्यक्तींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. सासरा बाळासो करणे आणि जावई सुरेश लोंढे यांच्या काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
गुन्ह्याची कबुली
ज्या नंबरवरून कॉल केला तो फोन बाळासो कुरणे या व्यक्तीच्या नावावर आढळून आला. पण हा मोबाइल जावई सुरेश लोंढे वापरत होता. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी सासरा बाळासो कुरणे आणि जावई सुरेश लोंढे या दोघांना अटक केली. सुरेश लोंढे याला वडगावमधून तर सासरा बाळासो कुरणे याला सांगली जिल्ह्यातून अटक केली. त्यानंतर आरोपींना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणण्यात आले. या दोघांच्यावर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.