हडपसर – महापालिकेच्यावतीने विकसित केलेल्या महंमदवाडी येथील कै.दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालय, कै.मधुकर रंगुजी घुले(पाटील) भाजी मंडई चे उद्घाटन तसेच तुकाई-दर्शन ते साईविहार नेहरू पार्कला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याची मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकणे,पालखी रस्ता कलव्हर्ट विकसित करणे व सर्व्हे नं.१७,१८ येथून जाणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. १० ) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या हस्ते होणार आहे.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी राज्यमंत्री सचिन अहिर , माजी राज्यमंत्री विजय शिवतारे ,सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.
“प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना या भागातील नागरिकांना व रुग्णांना महापालिकेच्या एका चांगल्या रुग्णालयाची आवश्यकता होती. याशिवाय भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची भाजी मंडई उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मोठ्या व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम सुरू करण्यात येणार आहे.या सर्व विकासकामांचा लोकार्पण सोहळा मंत्री महोदयांच्या उपस्थित होत असून त्यामुळे प्रभागातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण होत असल्याने मोठे समाधान वाटते.” – प्रमोद नाना भानगिरे (नगरसेवक)