तिरुअनंतपुरम – केरळातील डाव्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन नवीन पक्षांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. काँग्रेस (एस) चे रामचंद्रन कडन्नाप्पल्ली आणि केरळ काँग्रेस (बी) चे के बी गणेश कुमार शुक्रवारी दुपारी केरळच्या सीपीआय (एम) नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा दुपारी ४ वाजता राजभवन येथे झाला.
तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळात दोन नवीन मंत्र्यांचा समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली. त्या आधी डेमोक्रॅटिक केरळ काँग्रेसचे अँटोनी राजू आणि इंडियन नॅशनल लीगचे अहमद देवरकोविल यांनी अनुक्रमे परिवहन मंत्री आणि बंदरे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मे 2021 मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा डाव्या आघाडीच्या सरकारने राज्यात सत्ता हाती घेतली तेव्हा सरकार मधील घटक पक्षांनी “टर्म शेअरिंग” या आधारावर चार एकल आमदार पक्षांना मंत्रिमंडळात आळीपाळीने मंत्रिपदे देण्याचे ठरवले होते त्यानुसार आधीच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा देऊन आता दोन नवे मंत्री करण्यात आले आहेत.
केरळात २१ मंत्री घेण्याचीच मर्यादा आहे. ती लक्षात घेऊन प्रत्येकी एक आमदार असलेल्या चार पक्षांना आळीपाळीने मंत्रिपदे देण्याच ठरले होते. त्यानुसार हा बदल करण्यात आला.