ठाणे – महायुतीत लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही अशीच स्थिती आहे. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजप नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय केळकर म्हणाले, ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे.
यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो मात्र त्यांनी अद्याप येथून उमेदवार जाहीर केलेला नाही.
दरम्यान, विद्यमान खासदार राजन विचारे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही.