लखनौ – उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या १० जागांसाठी आज मतदान झाले व एकूण ३९५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराने म्हणजे उमाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिले.
त्यावरून कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षात भविष्यात युती होण्याची जी शक्यता वर्तवली जात होती त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. बसपा इंडियाच्या उमेदवारांना मत देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे काही आज झाले नाही.
अर्थात आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणेच लढणार असल्याचे मायावती यांनी अगोदरच जाहीर केले होते. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्टमध्ये म्हटले होते की आम्ही कोणाशीही आघाडी करणार नाही असे वारंवार सांगत असूनही आमच्या संभाव्य आघाडीच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
त्यातून एकच बाब सिध्द होते आहे की बहुजन समाज पक्षाला सोबत घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशात काही राजकीय पक्षांची डाळ शिजणार नाही. मात्र आमच्या दृष्टीने आमच्या लोकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे.