कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता.हातकणंगले) येथील दोन लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केली आहे. सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले यांच्याविरूध्द कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे.
महावितरणच्या इचलकरंजी ब उपविभागाच्या शहापूर शाखा कार्यालयाकडून 17 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वा. पासून ते 18 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे पर्यंत कोरोची (ता.हातकणंगले) येथील अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले या दोन लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष एमआरआयव्दारे तपासणी केली.
या तपासणीत रात्री 11.30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वीजेचा वापर सुरू असताना मीटरवरील वीजदाब व वीजप्रवाह शुन्य असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी शेजारील एका ग्राहकाच्या वीजमीटरची एमआरआयद्वारे तपासणी केली असता मीटरवर वीजदाब योग्य असल्याचे आढळून आले.