वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहेत, असा आरोप करत डेमोक्रॅटिक पक्षाने काल ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगासाठी आपली बाजू मांडली. युक्रेन सरकारकडे अवैधरित्या मेहरनजरची मागणी केल्याचा दावा एका जागल्याने केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार, पदाचा गैरउपयोग, आणि चौकशीत बाधा आणणे या संबंधात आपल्याकडे भरपूर पुरावे असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात काही मते मिळाल्यानंतर महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे तिसरे अमेरिकी नेते असणार आहेत.
पुढच्या वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे डाऊ कोलिन यांनी केला आहे. वरिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना दोषमुक्त केले जाईल, असेही ते म्हणाले.