भिगवण- उजनी धरणाचा पाणी फुगवटा देशी-परदेशी पक्षांचे नंदनवन म्हणून ओळखला जातो. चालू वर्षी पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने मोठ्या संख्येने परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पक्षी पाहण्यासाठी आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी पक्षीमित्रांनीही उजनीकाठी धाव घ्यायला सुरुवात केली आहे.
उजनीत भरपूर पाणी असल्याने पक्षांच्या उथळ पाण्याच्या जागा मोकळ्या झालेल्या नाहीत. मात्र, तरीही काही पक्षी तयांची संख्या, अदाकारी, रंगसंगती यामुळे पर्यटकांचे चित्त वेधत आहेत. भोरड्या किंवा रोझी स्टार्लिग हा थव्याने राहणारा सुमारे दोन अडीच लाख संख्येने विहार करणारा पक्षी आकाशातील त्याच्या अदाकारीने पक्षीप्रेमींना वेड लावतो आहे. बहिरी ससाणा सुमारे तीनशे किलोमीटर प्रतीतास वेगाने सुर मारून मासेमारी करताना पाहणे भव्य-दिव्यच आहे.
कुंभारगाव-डिकसळ (ता. इंदापूर) परिसरात फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख पक्षाचे आगमन झाले आहे. संख्या अद्याप कमी असली तरी पाणी कमी होईल, तसे हा पक्षी अधिक संख्येने दर्शन देईल, असे स्थानिक पक्षी निरीक्षक उमेश सल्ले यांनी सांगितले. परदेशी पक्षांच्या आगमनास सुरुवात झाली असून पाणी साठा कमी होऊ लागला की, प्रचंड संख्येने पक्षी पहायला मिळतील. पट्टकदम, भोरड्या, बहिरी ससाणा आणि मासेमार गरुड हे पक्षी सध्या पर्यटकांचे अकर्षणकेंद्र आहेत, असे सल्ले यांनी सांगितले.
- उजनीवर येणारे परदेशी पक्षी…
फ्लेमिंगो, राजहंस, चक्रवाक, नदीसुरय, टिपकेवाला गरुड, मासेमार गरुड, थापट्या बदक, तलवारी बदक, भोरड्या आदी युरोपातून येणाऱ्या पक्षांचे आगमन झाले आहे. बार हेडेड गुज किंवा पट्टकदम हा पक्षी तर मंगोलियातून हिमालय ओलांडून भारतात येतो. डोळ्यांच्या मागे पट्टे असणारा हा पक्षी पाहणे अनेक पर्यटकांचे स्वप्नच असते. - उजनीवर दिसणारे देशी पक्षी….
उजनी जलाशय परिसरात चित्रबलाक, राखी बगळा थंडीमध्ये यांचा डौल पाहणे तर मस्त अनुभव असतो. त्याबरोबरच पांढरे बगळे, पाणकावळा, वकिल पक्षी हे सोबतीला असतातच.