वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट त्या कंपनीने कायम स्वरूपी बंद करून टाकले आहे. त्यांच्याकडून हिंसाचाराला पुन्हा प्रोत्साहन दिला जाण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विटरने म्टले आहे. तीन दिवसांपुर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या राजधानीच्या शहरात जो धुमाकूळ घालून हिंसाचार केल्याची घटना घडली आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या ट्विटरवरील पोस्ट्सचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यांचे हे संदेश किती विपरीत परिणाम करणारे ठरू शकतात याचा अंदाज घेतल्यानंतर त्यांचे हे खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ट्विटरने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अशी नामुष्की ओढवलेले ट्रम्प हे जगातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
ट्रम्प यांचे ट्विटरवर 8 कोटी 87 लाख फॉलोअर्स होते. त्यांच्याकडून पुन्हा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे संदेश प्रसारीत केले जाऊ शकतात अशी शक्यता स्पष्ट दिसत असल्याचे ट्विटर कंपनीचे म्हणणे आहे. जागतिक नेत्यांचे म्हणणे जनतेपर्यंत थेट पोहोचावे म्हणून आम्ही अशा व्यक्तींची खाती सुरू ठेवली आहेत. पण या खात्यांचा उपयोग करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही असेही ट्विटरने म्हटले आहे.
ट्विटर बंदीवर ट्रम्प काय म्हणाले….
ट्विटरने माझे खाते बंद केले असले तरी मी आणि माझ्या समर्थकांचा आवाज ते दाबून टाकू शकणार नाहीत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्यो बायडेन यांच्या शपथग्रहण सोहोळ्याला आपण उपस्थित राहणार नाही असा शेवटचा संदेश ट्रम्प यांनी ट्विटरवर टाकल्यानंतर त्यांचे हे खाते कायम स्वरूपी बंद करण्यात आले.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की आपल्या बाबतीत असे काही तरी घडेल याची आपल्याला कल्पना होतीच. आता आमची अन्य काही सोशल मिडीया साईटशी चर्चा सुरू असून त्या बाबतीत आम्ही आता लवकरच घोषणा करणार आहोत. पण आमचा आवाज ते दाबून टाकू शकत नाहीत. आम्ही आमचे स्वताचेच सोशल मिडीया व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले आहे. ट्विटर हे काहीं मुक्त भाषणांचे व्यासपीठ नाही.
ते रॅडिकल डाव्यांचेच व्यासपीठ आहे. त्यांनी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांशी व डाव्यांशी हातमिळवणी करून त्यांनी माझे खाते बंद केले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. ट्विटर ही खासगी कंपनी असली तरी सरकाच्या मदतीशिवाय ती तगू शकत नाही असे भाष्यही ट्रम्प यांनी केले आहे.