वॉशिंग्टन – अमेरिकेतील नागरीकांना आणि राजकारण्यांना ट्रम्प यांच्या बाबतीत वेगळीच भिती वाटू लागली आहे. विक्षिप्त स्वभावाचे ट्रम्प हे आपल्या अध्यक्षपदाच्या उर्वरीत 12-13 दिवसात अणुयुद्ध पुकारण्याचा धोका त्यांना वाटू लागला आहे.
अध्यक्ष या नात्याने त्यांनी असा जर आदेश दिला तर तो मानू नका अशी विनवणी करण्यासाठी अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी लष्करी दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल मार्क मिल्ले यांच्याशी संपर्क साधला आहे.
अजून तरी ट्रम्प यांनी तसे काही संकेत दिले नसले तरी अमेरिकेतील कायद्यानुसार अण्विक युद्ध पुकारण्याचे सर्वाधिकार अमेरिकन अध्यक्षांकडेच असून त्यांना त्यासाठी अमेरिकेतील कोणत्याही अधिकाऱ्याची, कॉंग्रेसची किंवा मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज नाही. त्यामुळेच ट्रम्प हा धोका पत्करण्याची शक्यता अधिक आहे असे पेलोसी यांनी म्हटले आहे.
अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कर्नल डेव्ह बटलर यांनी नॅन्सी पेलोसी यांनी लष्कर प्रमुखांशी चर्चा केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. लष्कर प्रमुखांनी पेलोसी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तथापी ट्रम्प यांनी तसा आदेश दिला तर लष्कर तो मानणार काय या प्रश्नावर मात्र प्रवक्त्याने कोणतेही भाष्य केले नाही. हा तपशील मला सांगता येणार नाही असे ते म्हणाले.
अध्यक्षांनी दिलेला आदेश लष्कर प्रमुख नाकारू शकतात काय यावर अमेरिकेतील राजनितीज्ञांनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. तथापि लष्कराला अमेरिकेच्या अध्यक्षांनी अणुयुद्ध पुकारण्याचा बेकायदेशीर अधिकार दिला तर तो मान्य करणे किंवा न करणे हीं लष्कर प्रमुखांची मर्जी असते, आणि बेकायदेशीर आदेश ते डावलू शकतात असे काहींचे म्हणणे आहे. अमेरिकेची सारी अण्वस्त्रे ही अध्यक्षांच्या कमांडखालील ऍथॉरिटी आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या बाबतीत आता हा धोका तेथील लोकांना अधिक सतावतो आहे.