सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षक संघटना व पदाधिकार्यांमध्ये जोरदार खलबते झाली. सुमारे तीन तास चाललेल्या कमराबंद बैठकीत निघालेल्या तोडग्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 200 शिक्षकांच्या विनंती बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाली. दुर्गम भागातील अपात्र केलेले शिक्षक, महिला शिक्षकांना या प्रक्रियेत दिलासा मिळाला.
प्राथमिक शिक्षकाच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना शिक्षक संघटनांनी निवेदन दिले होते. त्यानुसार उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह संघटनांच्या प्रतिनिधींशी सोमवारी सकाळी चर्चा झाली. शिक्षक बदल्यांवर कमराबंद बैठकीत जोरदार खल झाला.
बैठकीत योग्य मार्ग निघाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात पदाधिकारी व अधिकार्यांच्या उपस्थितीत बदल्यांच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 200 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन समुपदेशनाने विनंती बदल्या करण्यात आल्या. बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळून ही प्रक्रिया राबवण्यात आली.