“बॅज’वर वाहतूक पोलिसांचा “वॉच’

गणवेश, बॅज नसणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गणवेश परिधान न करणे, बॅज नसणे, परवाना व इतर कागदपत्रे न बाळगणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी एकाच दिवसात 272 रिक्षांवर कारवाई करण्यात आली तर गेल्या आठ महिन्यांमध्ये सुमारे दहा हजार रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरही पोलिसांचा “वॉच’ असणार आहे. दरम्यान, प्रवासी, रिक्षाचालकाच्या तक्रारीही वाहतूक शाखेत येत असून, त्याचीही चौकशी सुरु केली आहे. मंगळवारी वाहतूक पोलिसांच्या विशेष तपासणी मोहिमेत 272 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी पोलिसांनी चौकात रिक्षा चालकांना थांबण्यास मनाई केली होती. मात्र, त्यानंतरची कारवाई थंडावल्याने पुन्हा अवैध रिक्षा वाहतूक बोकाळली होती. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 18 हजार रिक्षा धावतात. त्यापैकी अनेकजण नियमांचे उल्लघन करीत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यात, गणवेश परिधान न करणे, बॅज नसणे, अल्पवयीन मुलांकडून रिक्षा चालवणे, परवाना व इतर कागदपत्रे नसणे आदी कारणांवरुन कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याबाबतच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. यामुळे चौकातील कोंडी कमी होण्यास मदत होईल व वाहतुकीस शिस्त लागेल.

– नीलिमा जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.