#PhotoGallery : चिंचवडमध्ये पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांवर भर

पिंपरी – चिंचवडगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य दिव्य देखाव्यांची परंपरा यंदाही कायम राखली आहे. बहुतांश मंडळांनी पौराणिक व ऐतिहासिक देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एस.के.एफ गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 49 वे वर्ष आहे. हेमंत गाडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.

यंदाच्यावर्षी मंडळाने “जतन स्वराज्याचे’ हा जिवंत देखावा सादर केला असून त्यामध्ये 12 कलाकार सहभागी झाले आहेत. सध्या मावळ्यांच्या वेषभूषेचा वापर लग्नकार्यात स्वागतासाठी केला जातो. तसेच गडकिल्ल्यांचा वापर सहलीसाठी केला जातो. याकडे या देखाव्यातून लक्ष वेधण्यात आल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोईर यांनी सांगितले. अखिल मंडई मित्र मंडळाचे यंदाचे 30 वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षी मंडळाने “युगप्रवर्तक धर्मरक्षक संभाजी महाराज’ यांचा जिवंत देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ यांनी सांगितले. हा देखावा 27 मिनिटांचा असून त्यामध्ये 15 कलाकार सहभागी झाले असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष सागर गरूड यांनी सांगितले. चापेकर चौक, चिंचवडगाव येथील नवतरुण मंडळाने “रावणाचे गर्वहरण’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गांधीपेठ तालीम मित्र मंडळाचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. मंडळाने यंदाच्यावर्षी “अहिरावणाचा वध’ हा सात मिनिटांचा हलता पौराणिक देखावा सादर केला आहे.

दरवर्षी मंडळाच्यावतीने व्याख्यानमालेसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे विपुल नेवाळे यांनी सांगितले. चिंचवडमधील उत्कृष्ट तरुण मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष असून नागेशअप्पा आगज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकत्याच सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या पूरावर आधारित “देव माणसात आहे’ हा नऊ मिनिटांचा देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.