कापूरहोळ – गणेशोत्सवाच्या सुट्या संपल्यामुळे कोकण, महाबळेश्वर, गोवा आदी ठिकाणाहून पुण्याकडे येणाऱ्यांची गर्दी वाढल्याने पुणे-सातारा महामार्ग रविवारी जाम झाला होता. खेड-शिवापूर टोल नाक्यावर तसेच वेळूफाटा येथील सेवा रस्त्यावरील खड्डयांमुळे या ठिकाणी सुमारे दोन किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.
गणेशोत्सव आणि सलग सुट्यामुळे अनेक जण महाबळेश्वरला फिरायला गेले होते. सुट्या संपल्यामुळे तेथून नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे रविवारी दुपारनंतर पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. वेळू व चेलाडी फाटा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहतूक संथपणे सुरू होती. चेलाडी येथील उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे सातारच्याबाजुकडे सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोकणातून पुण्याकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणून अनेक जण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. टोल प्रशासनाचा संथ कामांमुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. टोल भरूनही कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे चालनकांनी नाराजी व्यक्त केली आहे.