तळेगाव ढमढेरे – येथील परिसरात कांदा लागवडीचा जोर धरला आहे. भीमा नदी शेजारून वाहत असल्यामुळे आणि पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी परिसरात पाणी सोडल्याने येथील अनेक शेतकऱ्यांचा उसाबरोबर कांदा लागवडीकडे कल असताना पाहावयास मिळत आहे.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, दरेकरवाडी, टाकळी भीमा, शिवतक्रार म्हाळुंगी येथे प्रमुख उसाचे पिक घेतले जाते. काहीजण शेतीला जोडधंदा असलेल्या दुधासाठी जनावरांच्या चारा करत आहे. तर आडपिक कांदा, मूग, बाजरी, भुईमूग, गहू, मका, भाजीपाला वाहतुकीच्या सोयीनुसार शेतकरी इतर पिके घेत असतो; परंतु नदीकाठचा भागात बाराही महिने पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल असतो, त्यामध्ये अंतर्गतपिक घेऊन उसाला झालेला खर्च भरून काढण्याचा प्रयत्न करतात तर काही जण दुप्पट नफा मिळवतात.
शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी काकरणी करून सरी पाडावी लागते, खते टाकून नंतर कांदा लागवड केली जाते, लागवडीसाठी महिला समूहाकडून 3500 ते 4000 असा खर्च होतो, बाजारभाव असल्यामुळे महिला मजुरांना रोजगार मिळण्यास मदत होऊन मजूरवर्ग कांदा लागवडीसाठी मिळत नसल्यामुळे 400 रुपये रोजाप्रमाणे घेतले जातात.