पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 377 पदांसाठी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल रविवारी जाहीर झाला. राज्य शासनाच्या समांतर आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रकातील तरतुदीनुसार हा सुधारित निकाल आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा दि. 16 ते 18 सप्टेंबर 2017 रोजी घेण्यात आली होती. यात जळगाव जिल्ह्यातील रोहितकुमार राजपूत हे राज्यातून प्रथम आले. सोलापुरातील अजयकुमार नष्टे हे मागासवर्गीय गटातून, तर पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या. सविस्तर निकाल व पदनिहाय प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 2 एप्रिल 2017 रोजी राज्यात घेण्यात आली होती. या पूर्व परीक्षेसाठी 1 लाख 98 हजार 599 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातून राज्य सेवा मुख्यपरीक्षेसाठी 4 हजार 839 उमेदवार पात्र ठरले होते. त्यातून लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 194 उमेदवार पात्र ठरले होते.