पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आता सिग्नलमुक्त झाला आहे. शिवाजीनगरकडून बाणेर आणि औंधकडे जाणाऱ्यांना पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटीमार्गे बाणेर रस्त्याने जावे लागेल. विद्यापीठ व औंधकडे जाणाऱ्यांना बाणेर रस्त्याने राजभवनच्या मागील बाजूने औंध रस्त्याकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गणेश खिंड आणि बाणेर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची समस्या बिकट झाली आहे. सायंकाळी विद्यापीठ चौकापासून कृषी महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, तर सकाळच्या वेळेत औंध- बाणेरच्या दिशेने रांगा लागतात. गेले काही महिने पुणेकरांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच हा मुद्दा उच्च न्यायालयात देखील गेला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतुकीची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात वाहतूक शाखेने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार औंध, बाणेरकडून येणारी वाहने आणि शिवाजीनगरकडून वाहने येणारी सिग्नलला न थांबता इच्छितस्थळी जाऊ शकतात.
वाहतुकीत बदल काय?
– शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्याने जाऊन उजवीकडे रेंजहिल्सकडे जाण्यास बंदी.
– आचार्य आनंदऋषीजी चौकातून (विद्यापीठ चौक) औंध, बाणेरकडे जाण्यास बंदी.
– विद्यापीठाकडून सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी उजवीकडे वळण्यास बंदी.
पर्याय काय?
– शिवाजीनगरकडून येऊन रेंजहिल्सकडे जाणाऱ्यांनी कॉसमॉस बँकेसमोरून यू टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.
– विद्यापीठाकडून येऊन सेनापती बापट रस्त्याकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी कॉसमॉस बँकेसमोरून यू टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
– बाणेरकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी विद्यापीठापासून पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटीमार्गे जावे.
– बाणेर व औंध रस्ता जोडण्यासाठी राजभवनाच्या मागील बाजूने रस्ता खुला करण्यात आला आहे. औंधकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी अभिमानश्री सोसायटीतून औंधकडे जाण्यासाठी या मार्गिकेचा वापर करावा.
या रस्त्यांवर अवजड वाहनांना २४ तास बंदी
– गणेशखिंड रस्त्यावरील चापेकर चौक ते आचार्य आनंदऋषीजी चौक
– औंध रस्त्यावर ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ
– बाणेर रस्त्यावर अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ
– सेनापती बापट रस्त्यावर जे. डब्ल्यू. मेरिएट हॉटेल ते पुणे विद्यापीठ