पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – परीक्षा संपल्यामुळे शाळांना सुट्टी, त्यात सलग सुट्टयांमुळे बाहेरगावी व कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. ९ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने द्रुतगती मार्गावर कडेला (शोल्डर लेन) थांबविण्यात येणार आहेत.
लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा ताण वाढतो. पर्यायाने वाहतुकीचा वेग संथ होतो. त्यामुळे घाट क्षेत्रात वाहतूक कोंडी होते आणि वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला थांबविण्यात येणार आहेत.
मोटारीसह हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मोटारींच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मर्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक बंद (ब्लॉक) ठेवण्यात येणार आहे.
मुंबई मार्गिकेवरील वाहतूक खंडाळा बोगदा परिसरात थांबवून पुणे मार्गिकेवरील वाहतूक विरूध्द दिशेने वळविण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे जड-अवजड वाहने बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलीस क्रेनच्या सहायाने वाहने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या मार्गिकेवरुन जाणाऱ्या अवजड वाहनचालकांविरुद्ध खटला दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वाहनचालकांना सूचना
वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे क्लच प्लेटमध्ये बिघाड होणे, इंजिनमध्ये बिघाड, वाहने गरम होऊन बंद पडतात. मोटारचालकांनी घाट क्षेत्रात वाहतूक संथ गतीने सुरू असताना मोटारीतील वातानुकूलन यंत्रणा बंद करावी. जेणे करून क्लच प्लेटवर ताण येऊन वाहन बंद पडणार नाहीत, असे आवाहन करण्यात आले आहे.