कोंडीचे वेळापत्रक !
* सकाळी 8 ते 11
* सायंकाळी 5 ते 8
पुणे, {सागर येवले} – शहरातील वाहतूक कोंडीचा फटका पीएमपी बससेवेला बसत असून, दररोज कोंडीमुळे लांब मार्गावरील सर्व बस पंधरा मिनिटे ते एक तासापर्यंत उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. असा परिस्थितीत पीएमपीलाच फीडर सेवेची आवश्यकता असून, या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि बसच्या फेऱ्या वेळेत पूर्ण होतील, अशी चर्चा सुरू आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सेवा दिली जाते. दररोज सरासरी सतराशे बसच्या माध्यमातून जवळपास 12 ते 13 लाख जण प्रवास करतात. दरम्यान, पुण्यात ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे, मेट्रोचे काम तसेच केवळ टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते, त्यामुळे झालेला अरूंद रस्ता, अतिक्रमण यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह ठिकठिकाणी कोंडी होते. त्यामध्ये सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत कोंडी डोकेदुखी बनली आहे.
शाळा, महाविद्यालय, शासकीय व खासगी कार्यालये, क्लासेस यासह सुटल्यानंतर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. तर पीएमपी बसही गर्दीने भरून जातात. मात्र, शहराच्या प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठ भागात एकाद बस शिरली, की कोंडीमुळे पंधरा मिनिटे ते एक तासापर्यंत बसला इच्छितस्थळी जाण्यासाठी उशीर होतो. त्यात बेशिस्त वाहनचालकांमुळे, एखादे वाहन रस्त्यात बंद पडले किंवा वाहतूक वळविल्यानंतर बसला कधीकधी दीड ते दोन तास उशीर होतो. त्यामुळे फेऱ्या उशिराने होत आहेत.
तब्बल ९०० बसेसना फटका
सकाळच्या सत्रानंतर सायंकाळपर्यंत पीएमपी बसचे संचलन सुरळीत असले. पण, सायंकाळी साधारणपणे पाच ते आठ वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे बसला उशीर होतो. संचलनातील एकूण बसपैकी जवळपास ८०० ते ९०० बसला हा फटका बसतो. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या बसेसना या कोंडीमधून मार्ग काढताना चालकांची कसरत होते. तर प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच बस उशिराने धावत असल्याने अन्य मार्गावरून येणार्या बस या एकाचवेळी बसस्टाॅपवर येत असल्याने संचलन विस्कळीत होते.
फीडर सेवा पर्यायाची चाचपणी
लांब पल्ल्याच्या बस या वाहतूक कोंडीच्या सुरुवातीला असलेल्या बसस्थानकावर प्रवाशांना सोडतील. तेथून छोट्या बस प्रवाशांना घेऊन इच्छित स्थळी जातील. त्यामुळे गर्दीच्या भागातील बस फीडर सेवेचे काम करतील आणि लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांना होणारा उशीर टाळून बसच्या फेऱ्या वाढतील. यामध्ये प्रवासांना फक्त बस बदलून प्रवास करण्याची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. त्याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांकडून चाचपणी सुरू असून, लवकरच हा पर्याय अवलंबण्यात येऊ शकतो.
शहरातील या भागातील वाहतूक कोंडी अडकतात बस…
स्वारगेट, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, नगर रस्ता, हडपसर, खडकी बाजार, वाकडेवाडी ते बोपोडी, विश्रांतवाडी, विमानगर, साडेबारा नळी, मुंढवा चौक, लोहगाव, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज बायपास, कोंढवा खडी मशीन चौक, हडपसर-उरुळी, वाघोली, हडपसर शेवाळवाडी, मंतरवाडी चौक, पुणे स्टेशन, बंडगार्डन रस्ता, पूलगेट, डांगे चौक, हिंजवडी शिवाजी चौक, मोशी चौक, तळेगाव चाकण चौक, चिखली, कृष्णानगर, आळंदी, वडगाव मावळ फाटा, भूमकर चौक, कोकणे चौक, मॅगझिन चौक, देहू फाटा, भोसरी चौक, सोमाटणे फाटा, तळेगाव-चाकण रस्ता, चाकण-खेड कॅनबे चौक, आळंदी फाटा\